बीड (प्रतिनिधी): “माझ्या कुटुंबाला मी डावावर लावलंय… मला रोज मारण्याच्या धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा घात करेल आणि संपवून टाकेल, याची मलाच कल्पना नाही. पण, मी समाजासाठी मैदानात उतरलोय, या मरण-बिरणाला मी भीक घालत नाही!” अशा अत्यंत रोखठोक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्ती येथे शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा करत, ‘पुढील वर्षभर आपले सर्व दौरे थांबवणार’ असल्याचे जाहीर केल्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘वर्षभर दौरे बंद; समाजासाठी नवी सिस्टीम उभी करणार’
मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना एक अत्यंत भावनिक साद घातली. ते म्हणाले, “आता मला कोणत्याही सत्कार-समारंभाला बोलावू नका. मला माझं काम करू द्या. पुढील वर्षभर मी माझे सर्व दौरे थांबवत आहे.” यामागील कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्या समाजबांधवाला अडचण आल्यास अवघ्या १५ मिनिटांत तिथे मदत उभी राहील, अशी एक भक्कम ‘यंत्रणा’ (System) उभारण्याचे काम मी हाती घेतले आहे.
“भंडारा लावून मारणार म्हणणाऱ्यांना माझं खुलं आव्हान!”
आपल्या जीवाला असलेल्या धोक्याबाबत बोलताना जरांगेंचा आवाज अधिकच आक्रमक झाला. “कोण म्हणतंय भंडारा लावून मारणार? रोज अशा धमक्या पाचोळ्यासारख्या येतात. पण माझा समाज गावोगावी पसरलाय. मला धमक्या देण्यापेक्षा हिंमत असेल तर समोर येऊन लढा,” असे खुले आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले.
खिशात रिक्षालाही पैसे नाहीत…
स्वतःवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना जरांगे यांनी अत्यंत भावूक विधान केले. “काही लोक म्हणतात की जरांगे आता मोठ्या गाड्यांतून फिरतो. पण ऐका, या सर्व गाड्या माझ्या समाजाच्या आहेत. जर आज या समाजाने मला गाडीतून खाली उतरवले, तर माझ्या खिशात साध्या रिक्षाने जायलाही पैसे नाहीत,” हे वाक्य उच्चारताच उपस्थितांचे डोळे पाणावले.
“लाडक्या बहिणीचे १५०० रुपये बाजारात जाईपर्यंत उडतात!” लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका करताना जरांगे म्हणाले, “कायम टिकेल असे काहीतरी हक्क मागा. बहिणींना दिलेले १५०० रुपये पुरतात का? ते तर बाजारात जाईपर्यंतच संपून जातात. आपण आपल्या लेकरा-बाळांची हीच किंमत केली आहे का?”
“मी जातपात पाहत नाही, शेतकरी पुत्रांनो एकत्र या!”
“जर मी जातपात पाहिली असती, तर महादेव मुंडे यांच्या कुटुंबासाठी लढलो नसतो. माझ्या लढ्यामुळेच दाबलेली केस उघडकीस आली,” असे सांगत त्यांनी सर्वांना सोबत घेण्याची भूमिका स्पष्ट केली.
तसेच, शेतकऱ्यांना साद घालत ते म्हणाले, “मी लाथ मारेन तिथून पाणी काढण्याची ताकद ठेवतो. तुम्ही फक्त माझी हाक ऐकून एकत्र या. मग बघतोच तुम्हाला कर्जमाफी, पिकाला हमीभाव, पीक विमा आणि दुधाला भाव कसा मिळत नाही! फक्त तुम्ही माझी साथ सोडू नका.”
मनोज जरांगे पाटलांच्या या भाषणामुळे आता मराठा समाजात आणि शेतकरी वर्गात एक नवी ऊर्जा निर्माण झाली असून, त्यांच्या ‘वर्षभर दौरे बंद’ करण्याच्या निर्णयावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगू लागली आहे.
महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येक रोखठोक बातमीसाठी वाचत राहा – hellobeed.in









