बीड : परळी तालुक्यातील टोकवाडी गावातील एका ऑटो रिक्षाचालकाने ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्माराम भांगे असे या दुर्दैवी घटनेतील मृताचे नाव असून, गुरुवारी (दि.२५) ही घटना घडली. त्यांच्या खिशातून पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी “आपले ओबीसी आरक्षण संपले आहे, त्यामुळे माझ्या मुलांना नोकरी लागणार नाही,” असे लिहिलेले असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोन मुलांच्या भवितव्याची चिंता
आत्माराम भांगे हे टोकवाडी – परळी मार्गावर प्रवासी ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना आदित्य आणि आदर्श असे दोन मुलगे असून दोघेही गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत होते. कुटुंबाची एकच आशा होती की मुलं सरकारी नोकरीत लागून कुटुंबाचा आर्थिक भार हलका होईल. मात्र गेल्या काही दिवसांत “ओबीसी आरक्षण संपले” या संदर्भातील बातम्या आणि सोशल मीडियावरील चर्चा ऐकून आत्माराम यांच्या मनात भीतीचे आणि चिंतेचे काळे ढग दाटू लागले.
गंभीर नैराश्यात गेले
घरच्यांच्या म्हणण्यानुसार, तीन-चार दिवसांपासून ते गप्प गप्प राहू लागले होते. घरच्यांनी कारण विचारल्यावर त्यांनी फक्त मुलांना कामधंदा बघण्याचा सल्ला दिला. “आता आपल्याला नोकरी लागणे शक्य नाही, आपले आरक्षण संपले आहे,” असे त्यांनी सांगितले. कुटुंबाने त्यांना समजावून सांगितले की अजून काही निर्णय झालेला नाही, पण तरीही त्यांच्यापासून हा विचार काही केल्या दूर झाला नाही. त्यांनी एका चुलत भावाजवळही आपली व्यथा मांडली आणि “माझ्या मुलांचे आयुष्यही माझ्यासारखेच ऑटो चालवण्यात जाणार, माझ्याकडे शेती-संपत्ती काही नाही, आता आरक्षणही संपले,” अशी खंत व्यक्त केली होती.
घरातच घेतला मृत्यूला कवटाळला
गुरुवारी सकाळी त्यांची पत्नी आणि मुलगा शेतातील आखाड्यावर दूध काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आत्माराम घरात एकटे होते. याच वेळी त्यांनी घरातील खोलीत साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने पत्नी आणि मुलगा घरी परत आले असता त्यांनी ही धक्कादायक घटना पाहिली. लगेच ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांची नोंद व तपास
परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. आत्माराम यांच्या खिशातून सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी स्पष्टपणे ओबीसी आरक्षण संपल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. यानंतर अधिक तपास परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक करत आहे.
गावात हळहळ व्यक्त
या घटनेने संपूर्ण टोकवाडी गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक गेल्यामुळे पत्नी आणि मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलांच्या भवितव्याबाबत त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. गावकऱ्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत प्रशासनाने मानसिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबांना समुपदेशन देण्याची मागणी केली आहे.
आरक्षण विषयावर वाढतं तणावाचं सावट
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षण विषयावर चर्चांना उधाण आले आहे. या विषयामुळे ग्रामीण भागातील अनेक युवकांमध्ये अनिश्चितता आणि नैराश्य वाढत असल्याचे समोर येत आहे. काही युवक आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत ही बाब चिंताजनक आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सरकारने आरक्षण विषयावर स्पष्ट भूमिका घेऊन जनतेत विश्वास निर्माण करावा, असे आवाहन केले आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याची मागणी केली जात आहे.










