हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

आष्टी तालुक्यात पूरस्थिती गंभीर – गावोगाव पाणी शिरले, संपर्क तुटले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

On: March 8, 2026 3:08 PM
Follow Us:

आष्टी (प्रतिनिधी):
आष्टी तालुक्यात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काल रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांवर मोठे संकट कोसळले असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे.

गावांना तळ्याचे स्वरूप, शेतं पाण्याखाली

शनिवार आणि रविवारच्या २४ तासांच्या मुसळधार पावसाने तालुक्यातील बहुतांश महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वाघुळज, सुलेमान देवळा, पिंपरखेड, हिवरा, देवी निमगाव, नांदूर, क-हेवडगाव या गावांतील पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गावात पूरपाणी शिरल्याने घराघरात प्रपंच विस्कळीत झाला आहे.

शेतकऱ्यांची सोयाबीन, उडीद, तूर, कांदा आणि कापसाची पिके कमरेएवढ्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले असून, कर्जमाफी व तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे.

वाघुळज पुल वाहून गेला, महामार्ग ठप्प

बीड-अहिल्यानगर महामार्गावरील वाघुळज येथील पुल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी रात्रीपासूनच युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. येत्या काही तासांत हा मार्ग पुन्हा सुरू होईल, असा विश्वास साळवे यांनी व्यक्त केला.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना अद्यापही पुराचा धोका कायम आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी नागरिकांनी अनावश्यक धाडस करू नये, नदी-नाल्यांच्या परिसरात न फिरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

प्रशासनाची पाहणी आणि पंचनामे सुरू

तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी तालुक्यातील विविध भागांची पाहणी केली असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे.

ग्रामस्थांची मागणी

ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने मदत पुरवण्याची मागणी केली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असल्याने अन्नधान्य, पशुखाद्य आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावांमध्ये आरोग्य विभागानेही सतर्कता मोहीम सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे, कारण अशा परिस्थितीत पाण्यातून पसरणारे रोग वाढण्याची शक्यता असते.

शेतकऱ्यांचे हताश चित्र

पूरामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेली शेती आता पुन्हा पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही वाया जाण्याची भीती आहे. सोयाबीन, कापूस आणि उडीद या पिकांना मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होणार आहे.

आष्टी तालुक्यात सध्या पूरस्थिती गंभीर आहे. प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक व बचाव कार्य सुरू आहे. मात्र, मुसळधार पावसाने उभा केलेला धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment