तलवाडा (ता. गेवराई) | हॅलो बीड प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील सर्वात मोठं व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचं गाव असलेल्या तलवाडा येथील एसटी बसस्टँडचा ‘पार्किंग ठिकाण’ म्हणून वापर सुरू झाल्याने प्रवासी आणि चालक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत मार्केटलगत असलेल्या दोन फ्लॉटफॉर्मयुक्त बसस्थानकात व्यापारी, बँक ग्राहक आणि वाहनधारक आपली खाजगी वाहने थेट स्टँडमध्ये उभी करतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे एसटी बसांना वळवण्यासाठी जागाच उरत नाही, प्रवाशांची चेंगराचेंगरी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. “एखादा जीव गमावल्याशिवाय एसटी महामंडळ जागे होणार नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, सकाळ-संध्याकाळी प्रवासाची गर्दी वाढते, त्यावेळी बस आणि चारचाकी वाहने एकत्र आल्याने पूर्ण परिसर गोंधळलेला असतो. काही प्रवासी बसमध्ये चढत असतानाच चारचाकी वाहनं जवळून जातात, त्यामुळे अपघाताची शक्यता कायम असते.
प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी या बेकायदेशीर पार्किंगविरोधात नियमित कारवाई करून दंड वसूल करावा, अशी मागणी नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे.
सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ कमी असली तरी, परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी तलवाडा एसटी बसस्थानक परिसरात तातडीने शिस्त व वाहतूक नियंत्रण व्यवस्था लागू करण्याची मागणी केली आहे.








