साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटू लागले असून, या घटनेत बीड जिल्ह्याचा उल्लेख वारंवार होत असल्यामुळे बीडकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले आणि या प्रकरणात सखोल चौकशीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुंडे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ती बीड जिल्ह्याची आणि ठराविक समाजातील असल्याने तिच्यावर भेदभाव केला गेला, तिला सतत हिणवण्यात आले, टोमणे मारले गेले,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणात काही लोकांनी जाणीवपूर्वक बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की, “या कुटुंबातील कोणालाही हे मान्य नाही की डॉक्टरने आत्महत्या केली आहे. घटनेच्या काही वेळ आधी तिने कुटुंबाला पीजी शिक्षणासाठी प्रमाणपत्र काढण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत आत्महत्येचा प्रश्नच येत नाही.”
धनंजय मुंडे यांनी पुढे सांगितले की, “या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी आणि त्यात वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी असाव्यात. त्यांच्याकडूनच तपास व्हावा, अशी आमची मागणी आहे. पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे हा प्रकार घडल्याचे दिसते.”
त्यांनी पुढे सांगितले की, “कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता डॉक्टरचा मृतदेह हलविण्यात आला. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि तिची चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी प्रशासनावर आहे. आम्ही हा विषय गप्प बसून सोडणार नाही.”
दरम्यान, मृत डॉक्टरच्या बहिणीने सुसाईड नोटवरील हस्ताक्षर तिच्या बहिणीचे नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे या बाबीकडे नवीन वळण मिळाले आहे. त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, “माध्यमांचे कान टोचत मी सांगू इच्छितो — आम्ही एकटे डॉक्टरला न्याय देऊ शकत नाही, माध्यमांनीही पुढाकार घेत न्याय मिळवून द्यावा. एका ऊसतोड मुकादमाला समोर आणून आम्ही सातारा जिल्ह्यातील कारखान्याकडून होत असलेली पिळवणूक देखील उघड केली आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील प्रशासन आणि पोलिसांवर तीव्र शब्दात टीका केली आहे. “राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे. पोलिसच गुन्हेगारीत सहभागी झाले आहेत, हे अत्यंत धोकादायक आहे. समाजात जाती-धर्मात तेढ निर्माण होत असून राज्यकर्ते लोकांचे लक्ष खरी समस्यांपासून विचलित करत आहेत,” असे ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणाने बीड जिल्हा तसेच वैद्यकीय क्षेत्रात संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.








