Beed Railway : बीडला मिळाली पहिली रेल्वे, फडणवीसांचा मोठा शब्द – “ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण”

बीड : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. दशकानुदशकं प्रतीक्षा असलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि बीड शहरात पहिल्यांदाच रेल्वेचा शिट्टीचा आवाज घुमला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड- अहिल्यानगर रेल्वे मार्गावर गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ही केवळ रेल्वे नाही तर बीडच्या विकासाची वाहिनी आहे. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं आणि आम्ही ही रेल्वे गोपीनाथराव मुंडे यांना अर्पण करत आहोत.”

रेल्वेच्या स्वप्नपूर्तीचा क्षण

बीडकरांसाठी हा क्षण भावनिक होता. अनेक दशकांपासून रेल्वेची मागणी होत होती. या मागणीसाठी माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अथक प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री म्हणाले, “ज्यांनी आम्हाला दिशा दाखवली त्या गोपीनाथ मुंडे यांना आज मी वंदन करतो. केशरकाकू क्षीरसागर आणि अनेक लोकप्रतिनिधींनी रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्यांचेही अभिनंदन करतो.”

फडणवीस यांनी सांगितले की, रेल्वे प्रकल्पात जमीन अधिग्रहण हे मोठं आव्हान होतं. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी देण्याचा निर्णय घेतला आणि केंद्राला पत्र पाठवलं. “या आधीच्या सरकारने फक्त ४०० कोटी रुपये दिले होते. पण आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत मराठवाड्याला २१ हजार कोटी रुपये दिले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आर्थिक-सामाजिक विकासाला गती

ही रेल्वे सुरू झाल्यामुळे बीडचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यातील रोजगार, पर्यटन, शेती उत्पादनांची वाहतूक आणि व्यापाराला चालना मिळणार आहे. “आजचा दिवस श्रेयवादाचा नाही, ही सामूहिक मेहनतीची फळं आहेत,” असे फडणवीस म्हणाले.

दुष्काळ संपवण्यासाठी मोठा निर्णय

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दुष्काळ समस्येवरही भाष्य केले. “पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही. कोल्हापूर-सांगली भागातील पूरपाणी उजनीला आणून ते पाणी मराठवाड्यात आणणार आहोत,” असे ते म्हणाले.

रेल्वेचे वेळापत्रक आणि स्थानके

बीड ते अहिल्यानगर असा १६७ किमी प्रवास हा रेल्वे मार्ग पूर्ण करणार आहे. आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावेल, रविवारी सुट्टी असेल.

  • अहिल्यानगरहून सुटण्याची वेळ: सकाळी ६.५५
  • बीडला पोहोचण्याची वेळ: दुपारी १२.३०
  • बीडवरून परतीची वेळ: दुपारी १ वाजता
  • अहिल्यानगरला पोहोचण्याची वेळ: संध्याकाळी ६.३०

तिकीट दर फक्त ४० रुपये असून, सध्या गाडी डिझेलवर चालणार आहे. पुढे विजेवर धावण्याची योजना आहे.

या मार्गावर एकूण १५ स्थानके आहेत – बीड, रायमोह, रायमोहा, विघनवाडी, जाटनांदूर, अळमनेर, हतोला, वेताळवाडी, न्यू आष्टी, कडा, न्यू धानोरा, सोलापूरवाडी, न्यू लोणी, नारायणडोहो आणि अहिल्यानगर.

उत्साहाचे वातावरण

या स्वप्नपूर्ती सोहळ्यात बीडकरांसह संपूर्ण मराठवाड्यात उत्साहाचे वातावरण आहे. बीडमध्ये रेल्वे धावल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत.

Leave a Comment