बीड: गेल्या चार दिवस विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून रात्री ११ वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुराने बहुतांश खरिपाचे पिके नष्ट झाली होती. जमिनी खरडल्यामुळे गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे उरलेल्या पिकांना देखील फटका बसल्याचे दिसून आले.
बीडमधील सहा तालुक्यांमध्ये २४ तासांत ५० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पाटोदा तालुक्यात ७० मिमी, धारूर ६३.८ मिमी, तर परळी ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या १८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून पाटोदा तालुक्यातील थेरला महामंडळात ११४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. धारूर, तेलगाव, घाटनांदूर मंडळात ८४ मिमी इतका पाऊस नोंदला.
शुक्रवारी रात्रभर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. परळी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर सरस्वती नदीच्या पुलाचे काम रखडल्याने वाहतूक धोकादायक झाली. परळी तालुक्यातील अहमदपूर शाळेत चार फूट पाणी साचल्याने शालेय साहित्याचे नुकसान झाले, तर माजलगाव तालुक्यातील बडेवाडी शाळेतही पाणी साचले. बीड शहरातील सखल भागातील पाणी शहराला नदीचे स्वरूप दिले, तर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातही पाणी घुसले.
परळी तालुक्यातील भिलेगाव पुलावरून पाणी जात असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. केजमध्ये एक तर माजलगाव तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला होता. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवली. माजलगाव धरणातून सिंदफणा नदीपात्रात विसर्ग केला जात असल्याने चिंचोली गावालाही पाण्याचा धोका निर्माण झाला आणि संपर्क तुटला.
माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडून सिंदफणा नदीपात्रात ११३,९२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. केजच्या धनेगाव येथील मांजरा धरणातून ३५,८८९ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला. प्रशासनाने सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी किंवा वाढवला जाईल.








