हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

लेकीचं दिवाळीत लग्न, पण शेती गेली… बळीराजाची व्यथा ऐकताच धनंजय मुंडेंनी दिले महत्त्वाचे आदेश

On: September 26, 2025 4:38 AM
Follow Us:

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला, घरे पडली, शेतातील पिके वाहून गेली आणि शेतकऱ्यांचे संसार उघडे पडले. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्यासमोर एका शेतकऱ्याने आपली हृदयद्रावक व्यथा मांडली आणि त्यावर मुंडे भावूक झाले.

परळी तालुक्यातील बोरखेड, लसमुख, ममदापूर या गावांना भेट देताना धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. लसमुख येथील शेतकरी तुकाराम कदम यांच्या शेतात गेले असता त्यांना पाच एकर कापसाचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आढळले. तुकाराम कदम आणि त्यांची पत्नी रेखा कदम यांनी डोळ्यात पाणी आणून आपली व्यथा व्यक्त केली. दिवाळीनंतर त्यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे, मात्र शेतीत काहीच उरले नाही. मुलीच्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे ही त्यांची मोठी चिंता होती.

धनंजय मुंडे यांनी त्यांचे दुःख ऐकून त्यांना धीर दिला. “तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे आश्वासन देत मुंडे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. बाधित कुटुंबांना तातडीने मदत म्हणून 20 किलो अन्नधान्य आणि प्रत्येकी 5,000 रुपये थेट खात्यात जमा करण्याची घोषणा केली.

मुंडे यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिन्यात 256 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. टप्प्याटप्प्याने पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईला अहवाल पाठवला जाईल आणि पुढील अनुदान दिले जाईल. विशेषतः भोई समाजाचे मोठे नुकसान झाल्याचे मुंडे यांनी सांगितले. घरातील संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे वाहून गेले असून सरकारकडून त्यांना तातडीची मदत मिळेल याची खात्री त्यांनी दिली.

यावेळी धनंजय मुंडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीची मागणी केली. “सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पूर आल्यावर ऊस उत्पादकांना दिल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनाही मदत मिळाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. सरकारने खुल्या हाताने तिजोरी उघडून शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांना मदत करावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.

तसेच, मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले. युवकांमध्ये आरक्षण गेले या भावनेतून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “कोणाचेही आरक्षण जाणार नाही, ही सरकारची स्पष्ट भूमिका आहे. युवकांनी आत्महत्या करू नयेत, सरकार त्यांच्या पाठीशी आहे,” असे मुंडे म्हणाले.

बीड जिल्ह्यातील पूरस्थिती सावरण्यासाठी मदतकार्य वेगाने सुरू आहे. पंचनामे पूर्ण होऊन अहवाल मुंबईला गेल्यानंतर पुढील अनुदान जाहीर होईल. मात्र, या सर्व प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी स्वतः पूरग्रस्त भागांना भेट देऊन लोकांना धीर देणे आणि थेट मदत जाहीर करणे हे शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment