आष्टी (बीड): आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा शिवारात १५ सप्टेंबर २०२५ रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि सोबतच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिके, शेतमाल तसेच शेतात बसवलेली उपकरणे यांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
धानोरा शिवारातील शेतकरी नागेश अशोक होळकर यांच्या गट नं. १४२/२/अ मधील शेतीमध्ये महावितरणकडून अनुदान प्राप्त ३ हॉर्स पॉवर क्षमतेचा सोलर संच बसवण्यात आला होता. हा सोलर संच ओसवाल पंपस लिमिटेड कंपनीकडून बसविण्यात आला होता आणि त्याचा नोंदणी क्रमांक MS230122911 असा आहे. मात्र १५ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसात वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण सोलर संच जमिनीवर कोसळला आणि पाण्यात वाहून गेला.
सोलर प्लेटचे नुकसान
संपूर्ण सोलर प्लेट फुटलेल्या अवस्थेत शेतात विखुरलेल्या होत्या. बसवलेले पाईप, वायरिंग आणि अन्य साहित्य पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. शेतात बसवलेला स्टाटर पाण्यात पूर्णतः बुडाल्याने त्यालाही मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचा सिंचन प्रकल्प पूर्णपणे ठप्प झाला असून पुढील हंगामात पिकांना पाणी देणे अवघड होणार आहे.
पिकांचे मोठे नुकसान
या अतिवृष्टीमुळे अडीच एकर पैकी दीड एकर क्षेत्रातील कांदा, उडीद, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे शेतातील वरची माती वाहून गेल्याने जमीन पुन्हा तयार करण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि खर्च करावा लागणार आहे. शिवाय कांद्यांची चाळीतही पाणी शिरल्याने साठवलेला कांदा कुजून गेला असून शेतकऱ्याला दुहेरी फटका बसला आहे.
पंचनामा पूर्ण
सदरील घटनेची माहिती स्थानिक प्रशासनास देण्यात आली असून महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पंचनाम्यात पिकांचे, सोलर संचाचे आणि इतर नुकसानीचे प्राथमिक मूल्यांकन करण्यात आले असून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पुढे पाठविण्यात येणार आहे.
शेतकऱ्याची मागणी
नुकसानग्रस्त शेतकरी नागेश होळकर यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अनुदानित सोलर संच पुन्हा बसवून द्यावा, पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि कांदा चाळीत झालेल्या नुकसानीसाठी मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिकांमध्ये नाराजी
धानोरा शिवारातील अन्य शेतकऱ्यांनीही प्रशासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे, त्यात असे नुकसान झाल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.










