बीड : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, ओबीसी कार्यकर्ता पवन कंवर याच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनीच घडवून आणला आहे. हाके यांनी आरोपींसोबतचे फोटो दाखवले असून, याच कार्यकर्त्याने पूर्वी फेसबुकवर पोस्ट करत “मला काम देऊ नका, पण हाके याला ठोकायची परवानगी द्या” असे म्हटले होते, असे हाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हाके म्हणाले, “विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये पवन कंवर जेवणासाठी गेला असता 20-25 जणांनी एकत्र येऊन हल्ला केला. यामध्ये पवन कंवर यांचा हात-पाय फ्रॅक्चर झाला असून डोक्यात रॉडने घाव घालण्यात आला आहे.”
प्रा. हाके यांनी बीडचे पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती हाके यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी (दि. 23) रात्री साडेनऊच्या सुमारास केरवाडी पालम येथील पवन कंवर व त्यांचे तीन साथीदार सावरगावजवळ एका धाब्यावर जेवत असताना 40 ते 50 अज्ञात युवकांनी त्यांच्यावर हल्ला केला. काठ्या, रॉड आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीमध्ये पवन कंवर गंभीर जखमी झाले. त्यांना व त्यांच्या साथीदारांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक बालक कोळी घटनास्थळी पोहोचले असून आरोपी फरार झाले आहेत.
हनुमंत धायगुडे यांचा हाकेंवर पलटवार
हाके यांचे जुने सहकारी हनुमंत धायगुडे यांनी मात्र हाकेंवरच टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “हाके बीडमध्ये सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. जातीपातीचे राजकारण थांबवले नाही तर बीडचा आणि महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही.” धायगुडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, जातीवाद वाढवून समाजात फूट पाडू नये असे आवाहन केले.








