हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

नाथ्रा फार्महाऊसवर माझ्या विरोधात बैठका; दादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

On: November 16, 2025 4:35 AM
Follow Us:

बीड | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये बीड जिल्ह्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे.

आमदार सोळंके यांनी असा आरोप केला आहे की “माझे राजकीय विरोधक आणि त्यांच्याशी संबंधित काही लोक परळी तालुक्यातील नाथ्रा येथील फार्महाऊसवर बैठका घेत आहेत. या सर्व हालचालींच्या मागे धनंजय मुंडे आहेत.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची रणनीती आखत असताना पक्षात अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सोळंके–मुंडे यांच्यातील वाद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत.

सोळंके म्हणाले, “विधानसभेच्या वेळी माझ्या विरोधात दोन उमेदवार उभे केले गेले होते. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे. याची कल्पना मी यापूर्वीच अजितदादांना दिली आहे.”

दरम्यान, धारूर आणि माजलगाव नगरपालिकांच्या निवडणुकांत युती होण्याची शक्यता असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन्ही ठिकाणी भाजपचे स्वतंत्र पॅनल जाहीर केले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात अधिक तणाव निर्माण झाला आहे.

आता आमदार सोळंके यांनी केलेल्या तक्रारीवर पक्ष नेतृत्व काय कारवाई करते आणि धनंजय मुंडे यांचे प्रत्युत्तर काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now