सातारा | प्रतिनिधी — साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी शनिवारी (२५ ऑक्टोबर) मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याने फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये स्वतःहून शरणागती पत्करली आहे.
यापूर्वी या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याने शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती. दोन्ही आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सखोल चौकशी सुरू आहे.
पीडित महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोघांची नावे स्पष्टपणे आढळली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
तपासाला वेग
सातारा पोलिस उपअधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की,
“गोपाळ बदने पोलिसांना शरण आल्याने आता या प्रकरणाचा तपास जलदगतीने पुढे जाईल. आधीच एक आरोपी अटकेत असून, दोघांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणले जाईल.”
मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं होतं की, “पोलिस कर्मचारी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणतात आणि आरोपी फिट नसतानाही ‘फिटनेस सर्टिफिकेट’ द्यावे, असा दबाव आणतात.” याच वादातून डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तणाव वाढला होता.
खासदार आणि पीएचा उल्लेख
या प्रकरणातील एका पत्रात डॉक्टरने माजी खासदार आणि त्यांच्या पीएचा उल्लेख केला होता. पीएच्या मोबाईलवरून आरोपी अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला, असं डॉक्टरने लिहिलं होतं. मात्र, या प्रकरणाचा सध्याच्या गुन्ह्याशी थेट संबंध नसल्याचं एसपी तुषार दोशी यांनी स्पष्ट केलं.
आरोग्य विभागात खळबळ
या प्रकरणामुळे सातारा जिल्हा पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. महिला आयोग आणि डॉक्टर संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोन्ही आरोपींच्या चौकशीनंतर या आत्महत्येच्या मूळ कारणांचा उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










