बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सीना आणि मेहेकरी नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, परिसरातील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रस्ते, शेतं आणि घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. प्रशासनाला युद्धपातळीवर मदतकार्य करावे लागले आहे.
रविवारी रात्री उशिरापर्यंत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सीना आणि मेहेकरी नदीच्या खोऱ्यातील पाणी अचानक वाढले. परिणामी नदीकाठच्या गावांमधील अनेक कुटुंबांना धोका निर्माण झाला. स्थानिक प्रशासनाने तातडीने एनडीआरएफ पथक आणि महसूल यंत्रणेला पाचारण केले. बचाव कार्य रात्रभर सुरू ठेवण्यात आले आणि एकूण 13 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रेस्क्यू मोहिमेत पोलिस, महसूल कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवक यांचा मोठा सहभाग होता.
पूरस्थितीमुळे तालुक्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. आष्टी–बीड, आष्टी–जळगाव आणि आष्टी–पटोदा या मार्गावरील अनेक लहान पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शेतकरी वर्गावर या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये उभे असलेले कापूस, सोयाबीन आणि मूग पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूरपाण्यामुळे शेतजमिनी खरडून गेल्याच्या घटना नोंदल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भवितव्यावर संकट ओढवले आहे.
गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे देखील तालुक्यातील अनेक ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. नागरिकांना घरीच थांबण्याचे, पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला मागणी केली आहे की, नदीकाठच्या गावांमध्ये कायमस्वरूपी बंधारे आणि पूरप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. तसेच बचाव दलांची संख्या वाढवून सतत गस्त ठेवावी, जेणेकरून अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जीवितहानी होणार नाही.
हवामान खात्याने पुढील 24 ते 48 तासांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने आष्टी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात अलर्ट मोड जाहीर केला आहे. ग्रामपंचायतींना सूचना देऊन नदीकाठच्या गावांमध्ये माईकवरून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
या मुसळधार पावसामुळे फक्त शेतीचेच नाही तर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून दळणवळणाची साधने बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. तालुका प्रशासनाने महावितरणला तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य विभागानेही सतर्कता दाखवली आहे. दूषित पाण्यामुळे साथरोगाचा धोका वाढू नये म्हणून औषधफवारणी, क्लोरीन टॅब्लेट वाटप आणि आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत.
आष्टी तालुक्यातील पावसाचे हे थैमान थांबण्याची चिन्हे अद्याप नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवली असून नागरिकांना अफवा न पसरवण्याचे, सुरक्षित स्थळी हलण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.










