बीड: शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात घडलेल्या हत्याकांडाने बीड हादरले आहे. पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांच्या मुलगा यश ढाका (वय 20) याचा मित्रांसोबत झालेल्या वादातून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना २५ सप्टेंबरच्या रात्री घडली असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर चार आरोपी अजूनही फरार आहेत.
शेवटचा संवाद ठरला वडिलांचा अखेरचा कॉल
मयत यश ढाका याचे वडील देवेंद्रसिंग ढाका (रा. बलभीम नगर पेठ, बीड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते कामानिमित्त घराबाहेर पडले होते. दुपारी साडेदोनच्या सुमारास त्यांनी यशला फोन करून त्याचा धाकटा भाऊ युवराजला MIDC येथून घरी आणण्याबाबत सांगितले. मात्र यशने त्या वेळी गाडी नसल्याचे सांगून तो बाहेर असल्याचे कळविले. त्यानंतर देवेंद्रसिंग यांनी दुसऱ्या व्यक्तीला युवराजला आणण्यासाठी पाठवले आणि कामात व्यस्त झाले.
रात्री धक्कादायक फोन
रात्री साडेआठच्या सुमारास बसस्थानक परिसरात असताना देवेंद्रसिंग यांना चुलतभाऊ अमरसिंग ढाका यांनी फोन करून यशवर माने कॉम्प्लेक्स परिसरात वार झाल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्री गणेश वॉशिंग कंपनीसमोर पोहोचताच यश रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
शेवटपर्यंत प्रयत्न पण जीव वाचला नाही
देवेंद्रसिंग यांनी मुलाला जवळ घेतले असता त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे दिसले. शर्ट-पॅन्ट रक्ताने माखलेले होते. त्यांनी मुलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीच बोलला नाही. काही वेळात रुग्णवाहिका आली आणि यशला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून यशचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मित्रांकडून धक्कादायक माहिती
घटनास्थळी असलेल्या यशच्या दोन मित्रांनी सांगितले की, आरोपी सुरज आप्पासाहेब काटे आणि त्याच्या साथीदारांनी यशवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या आधारावर देवेंद्रसिंग ढाका यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत खूनाचा गुन्हा दाखल केला.
पाच आरोपींवर खुनाचा गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी 302 कलमान्वये एकूण पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित चार आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक नेमले असून तपास डीवायएसपी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रस्तारोको आंदोलन
या घटनेनंतर नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर भर पावसात तब्बल दोन तास रस्तारोको आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन देत तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपींना अटक करू असे सांगितले.
शोकाकुल अंत्यसंस्कार
पोलिसांच्या आश्वासनानंतर यशचा मृतदेह ताब्यात घेऊन बीड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात असून ढाका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यशच्या पश्चात आई, वडील व धाकटा भाऊ असा परिवार आहे.
तपास सुरू
पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबवली असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.








